कत्तलीसाठी जनावरे घेऊन निघालेला टेम्पों ताब्यात
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 12 ः कत्तलीसाठी जनावरे घेऊन निघालेल्या टेम्पोवर डीवायएसपी पथकाने कारवाई केली. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे गावच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या 13 गाईंची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी 10 लाख 65 हजार रूपयेंचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमीर मुनीर बागवान, जुनेद मुनीर बागवान दोघेही (रा. मंगळवार पेठ, कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सातारा जिल्ह्यात गोवंशीय जातीचे अवैध वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना डीवायएसपी अमोल ठाकूर यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डीवायएसपी पथक रात्रगस्त करत असताना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी सदरचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता कराड बाजूकडे निघून गेले. त्यावेळी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी तळबीड पोलीस ठाण्यास संपर्क करून सदर वाहन थांबविण्याबाबत सूचना केल्या. त्याअनुषंगाने तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर सदरचे वाहन थांबवून ट्रकच्या हौद्यामध्ये काय आहे असे विचारले असता जमीर बागवान व जुनेद बागवान यानी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनाच्या हौद्यामध्ये पाहिले असता 13 पांढऱ्या रंगाचे गोवंश जातीचे बैल दाटीवटीने, क्रूरपणे बांधून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी वाहनासह एकूण 10 लाख 65 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अंमलदार सागर बर्गे, दिपक कोळी, सनि दिक्षीत, निलेश विभुते, मानेतेश कोळी, दिनेश घाडगे यांनी केली.