वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
वडूज : वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
याबाबत देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील म्हटले आहे की, राज्यामध्ये कोविड संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. माण आणि खटावमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे, त्यामुळे रुग्णांकडून ऑक्सिजन बेडची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून व खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेडच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तथापि, मागणी पाहता या सुविधा अपुर्या पडत आहेत. लोकांना सातारा, सांगली, पुणे, बारामती याठिकाणी आम्ही बेड उपलब्ध करून देत आहोत, परंतु त्याही ठिकाणी संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने बेड अपुरे पडत आहेत. त्यामुळे माण आणि खटावमध्ये ड्रीम सोशल फाउंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने व सहकार्याने सुसज्ज असे ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर उभे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक असलेली औषधे गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कोरोनाच्या दुसरे लाटेने माण व खटाव मध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. काही जवळचे सहकार्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्रयत्न करूनही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने आम्हाला खूप वेदना झाल्या आहेत. त्या बद्दल खूप दुःख वाटते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या संसर्गामुळे घरातील प्रमुख व्यक्तीचे प्राण गमावल्याने काही कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे.
लोकांच्यात खूप भीतीचे वातावरण आहे, परंतु आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी न घाबरता लक्षणे दिसून येताच तात्काळ तपासणी करून घ्यावी व उपचार सुरू करावेत. लवकर व योग्य उपचार सुरू केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे, त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करून औषधोपचार सुरू करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी.
आपण सर्वांनी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत करून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी पत्रकात केले आहे.