कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 30 ः सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून पाच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अखिलेश सूरज नलवडे व आदर्श विनोद कोरे दोघेही (रा. गजानन हौसिंग सोसायटी ओगलेवाडी, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार दि. 26 डिसेंबर ते बुधवार दि. 27 डिसेंबर दरम्यान सैदापूर येथील कृषी मंडल अधिकारी यांचे कार्यालय चोरट्यांनी धारदार एक्सब्लेडने कुलूप कट करून तोडले होते. कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरीस गेले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात कृषी मंडल अधिकारी यांनी तक्रार दिली होती. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना चोरट्ययांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने राजू डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्याठिकाणी चोरट्यांनी ज्या एक्सब्लेडने कार्यालयाचे कुलूप कट केले होते, सदरचे ब्लेड हे घटनास्थळीच मिळून आले आणि तपासास सुरूवात झाली. डीबी पथकाने एक्साब्लेडच्या आधारे अखिलेश नलवडे व विनोद कोरे या दोघांना गजानन हौसिंग सोसायटी येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक डुबल करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, वैभव पवार, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.