जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहीण-भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.
फलटण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहीण-भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.
फलटण शहराचे उपनगर व तालुक्यातील महसूल व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी कोळकी गावची ओळख आहे. कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या रेश्मा देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख यांची पुतणी तनिष्का गजानन देशमुख (वय 14), समीक्षा गजानन देशमुख (वय 9) व मुलगा हर्षद संजय देशमुख (वय 12) हे या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.
ग्रामपंचायतीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या देशमुख बहीण-भावानी सलग चारशे जोर मारले. ते दररोज नियमितपणे पहाटे पाच वाजता उठून योग, सपाट्या, जोर असा व्यायाम करतात. त्यासाठी त्यांना पै. संजय देशमुख व गजानन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभते.
या बहीण-भावंडाचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा व कौतुकाचा ठरला आहे. इंटरनेटच्या जाळात अडकलेल्या मुलांसाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी व्यक्त झाल्या.
या उपक्रमानंतर माजी सरपंच व ज्येष्ठ नेते दत्तात्रय शिंदे, सरपंच विजया नाळे यांनी मुलांचा सत्कार केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास नाळे, रमेश नाळे, अक्षय गायकवाड, गणेश शिंदे, शिवाजी भुजबळ, रेश्मा देशमुख, रूपाली चव्हाण, सपना कोरडे, वर्षा शिंदे, प्राजक्ता काकडे आदींसह ग्रामपंचायत सदस्या, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.