येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण : येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे पिंप्रद येथील गावच्या हद्दीत दि. 10 रोजी रात्री 11 वाजता गट क्रमांक 3 मध्ये संशयित आरोपी कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण) यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी कल्पना अशोक पवार (वय 45, रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) या महिलेने खरेदी केलेली जमीन गट नं. 3 ही वहीवाट नये म्हणून जमिनीमध्ये फिर्यादीने टाकलेली झोपडी संशयित पाच आरोपींनी पेटवून दिली. या आगीत झोपडीमध्ये झोपलेली महिला महुली उर्फ मौली झबझब पवार हिचा मृत्यू झाला असून, महुली हिचा खून करून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी फिर्यादी कल्पना अशोक पवार (वय 45, रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या असून, या घटनेचा तपास सुरू आहे.