विजय दिवस समितीच्या रक्तदान शिबीरास कराडकरांचा प्रतिसाद
Published:Dec 15, 2020 12:20 PM | Updated:Dec 15, 2020 12:20 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला आहे. मात्र ज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्यावतीने आज मंगळवारी (ता. १५) रक्तदान शिबीर घेण्यात आले. भारतीय सैन्यदलाच्या विजयाचे साक्षीदार असेलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातुन येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने भारतीय सैन्यदलाच्या सहकार्याने १३ ते १६ डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कऱ्हाडमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या कसरतींनी आणि कार्यक्रमांनी गेली २२ वर्षे हा विजय दिवसचा सोहळा अविस्मरणीय ठरतो. मात्र यंदा कोरोनामुळे तो सोहळा स्थगीत करण्यात आला आहे. मात्र सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचा विचार करुन विजय दिवस समितीच्यावतीने जवानांच्या सन्मानार्थ मंगळवारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले. येथील यशवंतराव चव्हाण ब्लड बॅंकेत रक्तदान शिबीराच्या उदघाटनप्रसंगी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, सभापती विजय वाटेगावकर, दिलीपभाऊ चव्हाण, लेष्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, सुभेदार जयवंतराव नलवडे, संदीपान डोळे, प्रा. बी. एस. खोत, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, सहसचीव विलसराव जाधव, रमेश पवार आदी उपस्थित होते. रक्तदात्यांनी या शिबाराला मोठा प्रतिसाद दिला.