मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः येथील कार्वेनाका परिसरात मुलीच्या प्रेमसंबंधातून शनिवारी भरदिवसा युवकावर टोकदार शस्त्राने वार करून त्याचा खून झाला. त्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. त्याला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री दोन वाजता मलकापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मोबीन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत शुभम चव्हाण व मोबीन इनामदार या दोघांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून काही दिवसापूर्वी येथील प्रतिसंगम परिसरात वाद झाला होता. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा पूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी कार्वे नाका येथेे गेला होता. यावेळी जुना वाद मिटवताना मोबीन व शुभम चव्हाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाची सुरू असताना मोबीनने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने अचानक शुभमच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर व कानावर सपासप वार केले. यामध्ये शुभमचा मृत्यू झाला. त्यानंतर मोबीन याने घटनास्थळावरून पलायन केले होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली होती. पोलिसांना मोबीन हा मलकापूर येथील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबीन याला रात्री दोन वाजता एका शेतातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.