'कराड अर्बन' राज्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर संस्था : माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील
News By : कराड | संदीप चेणगे
कराड अर्बन बँकेचे अध्क्ष डॉ.सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त कराड अर्बन स्पोर्टस् क्लब कराड यांच्यावतीने कराड तालुका आंतर शालेय मिनी अॅथलेटिक्स स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा दि.5 व 6 जानेवारी रोजी शिवाजी स्टेडियम कराड येथे पार पडल्या. यामिनी अॅथलेटिक्स स्पर्धेेमध्ये सुमारे 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्राने सहकार व आर्थिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून आपल्यासोबतच्या सर्व सहकारी पतसंस्था व बँकाना प्रशिक्षण देण्याचे काम नेहमीच केलेले आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी कराड अर्बन सेवक प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे राज्यातील सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून नुकतेच अधिसूचित केले आहे, असे गौरवोद्घार माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी काढले. कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन माजी सहकार व पणन मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुरूवार दि. 5 जानेवारी रोजी पार पडले. यावेळी ते बोलत होते. बँकेचे अध्क्ष डॉ. सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त बँकनेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते. यंदा अर्बन बँकेच्या या अद्ययावत सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होत असताना मला आनंद होत आहे की बँकेच्या सेवक व प्रशिक्षण केंद्राने सहकार क्षेत्र टिकले पाहिजे या हेतूने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी बँका व पतसंस्थांना होणार्या बदलांचे ज्ञान देत प्रॅक्टिकल प्रशिक्षण देत आलेली आहे. यामुळेच बर्याच आर्थिक संस्थांना याचा फायदा होत असून कराड अर्बन बँकेचा नावलौकीक वाढत चालला आहे. सध्याच्या बदलत्या काळात ज्या संस्थांनी सहकार व आर्थिक क्षेत्रात होणारे बदल आत्मसात केले व ते अवलंबले त्याच बँका व पतसंस्था टिकून राहिल्या असल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बँकेचे अध्क्ष डॉ.सुभाष एरम यांचा 73 व्या वाढदिवसानिमित्त आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांच्यासह सर्व संचालक व विविध बँकांचे व पतसंस्थांचे चेअरमन व अधिकारी उपस्थित होते. कराड अर्बन बँकेने सन 1997 मध्ये केलेली सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या नावाने केलेली गुंतवणूक ही आजची गरज बनली आहे, याचा आज आम्हाला अभिमान वाटतो. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सुरूवातीच्या काळात फक्त कराड अर्बन बँकेच्या सेवकांना प्रशिक्षण देत असताना आपल्यासोबत आपल्या मित्र संस्थांची सुद्धा प्रगती होणे गरजेचे आहे या उद्देशाने बँकेने आसपासच्या बँका व पतसंस्थांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. यामुळे त्या-त्या संस्थांतील सेवकांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण निर्माण होत असते. आज या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राची ही अद्ययावत इमारत आपण पाहतोय ती फक्त आ. बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यामुळेच असे मनोगत यावेळी कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केले. डॉ.सुभाष एरम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझ्या 20 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सेवकांमध्ये कोणत्याही प्रकारची संघटना निर्माण झालेली नाही, संचालक मंडळ निवडणूक नेहमीच बिनविरोध होत आलेली आहे. ही सभासदांनी माझ्यावरती व संस्थेच्या कारभारावरती दाखवलेल्या विश्वासाचे फलित आहे. बँकेत कार्यरत असणारे सर्व विभाग हे स्वावलंबी आहेत, येथे कोणत्याही प्रकारच्या बँकेबाहेरील संस्थेचे अथवा व्यक्तीची मदत घेतली जात नाही. याचे कारण म्हणजे सेवक व संचालक यांच्यामध्ये नेहमीच ताळमेळ असतो; ही संस्कृती स्वर्गीय डॉ. द. शि. एरम व कुटुंबप्रमुख भाऊ यांनी बँकेत रूजविली आहे. आणि तीच संस्कृती मु‘यकार्यकारी अधिकारी गुरव साहेब पुढे चालवित आहेत आणि यामुळेच बँक व सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्र आज या प्रगती पथावरती पोहचली आहे. सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राद्वारे जे प्रशिक्षण दिले जाते ते सुद्धा बँकेच्या वरिष्ट अधिकारीवर्गाकडूनच दिले जाते. सेवक प्रशिक्षीत असतील तरच संस्था प्रगती करू शकतात याचे भान ठेवूनच कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राद्वारे विविध संस्थांच्या सेवकांना परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करत असताना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी सांगितले की, बँकेच्या 105 वर्षाच्या काळात अध्यक्षपदाचा सर्वाधिक कालावधी म्हणजे 21 वर्षांचा कालावधी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी भूषविला आहे. डॉ.सुभाष एरम यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेच्या 38 शाखांवरून 62 शाखा झाल्या असून एकूण व्यवसायात 546 कोटी वरून 4500 कोटीपर्यंत मजल मारली आहे. तसेच 1997 साली सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राची स्थापना करून आज त्यास महाराष्ट्र राज्यातील शिखर संस्थेची मान्यता मिळविली आहे. त्याच संस्थेच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या वाढदिवसानिमित्त करण्याचे योजले आहे. याचप्रमाणे कराडअर्बन बँकेने स्वयंचलित क्लिअरींग प्रणालीचे उद्घाटन केले. तसेच बँकेच्या ग्राहक सेवा व इतर उत्पन्नामध्ये वाढ करण्याच दृष्टीने जीवन विम्यासाठी एल.आय.सी. सोबत कार्पोेरेट एजन्सी सुरू केली असल्याचे यावेळी सांगितले. सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्राचार्य देशपांडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.