करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
वाई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु होते. उशिरा पर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे चौदा जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचार्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्या कडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे.
या चौदा जणातील अनेक जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली.या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे. उशिरा पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता व त्यांना अटकही करण्यात आली नव्हती. पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. या दोघानी संबंधित चौदा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.दरम्यान पुण्यातील पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत उशिरा पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलीस प्रथम दर्शनी दाखल करणार आहेत व नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहेत.
वाई पोलीस ठाण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे व पथक दाखल झाले आहे.