माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
म्हसवड : माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
या मुसळधार पावसामुळे माण तालुक्याच्या पूर्व भागाते असलेल्या कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले असून, कांद्याचे पीक वाया गेले आहे. म्हसवड परिसरामध्ये सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे ओढ्याला पाणी आले असून, काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे तर म्हसवड परिसरातील ओढे भरून वाहू लागले आहेत. तसेच नदीच्या पात्रातील कोल्हापूर टाईप बंधारे तुडुंब भरले असून, माण नदीवर असलेला राजेवाडीचा तलाव भरून वाहू लागला आहे. पळसावडे-लिंगिवरे या रस्त्यावर असलेले पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प झाले आहे.
या पावसाने म्हसवड शहरातील शेतकर्यांचे गहू, बाजरी, मका, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच माण तालुक्यातील केटीवेअर भरल्यामुळे शेतकर्यांची चिंता मिटली आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने शेतकर्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
शिखर शिंगणापूर परिसरामध्ये मार्डी, मोही, वावरहिरे परिसरात जोरदार पावसामुळे रस्ते खचले असून रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या वाढली आहे. दोन दिवसांमध्ये चार दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.