वरकुटे, ः करोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मार्गदर्शक प्रणालीप्रमाणेच आणि आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केली आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईकांची मानसिकता आणि डॉक्टरांची समयसुचकता याचा मेळ घालणे गरजेचे आहे. भारतीय वैद्यक परिषदेने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे औषधोपचार होणे गरजेचे आहे. इंजेक्शन रेमडेसीवीरचा रुग्णांच्या आग्रहाखातर केलेला अतिरिक्त वापर आता गंभीर रूपाने प्रकट होतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. रुग्ण आणि डॉक्टरांची उपचारादरम्यान परस्पर सहमती असेल, तरच या साथीचा एकोप्याने यशस्वी मुकाबला करणे शक्य होईल, असे डॉ विजय लाड म्हणाले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या या मागणीला पुण्यातील या विषयांचे तज्ञ डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. नरेंद्र जावडेकर व इतरांनी पाठींबा दर्शविला आहे.