सोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे
News By : Muktagiri Web Team

निढळ ः खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी सोयाबीनमधील उच्चतंत्रज्ञानाचा अवलंब करणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ होते, असा विश्वास कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केले.
निढळ, ता. खटाव येथे ‘हिंदमाता फार्मस प्रोड्यूसर कंपनी’चे सदस्य व शेतकर्यांना सोयाबीन केडीएस 726 बियाणे वाटप करुन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने खरीप हंगामामध्ये तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर, मंडळ कृषि अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शानानुसार बियाण उगवण क्षमता चाचणी, रासायनिक खताची बचत व त्यांचा कार्यक्षम वापर, हुमणीचे नियंत्रण, मोहिमा सुरु असून त्यास शेतकरी वर्गातून प्रतिसाद मिळत आहे. तसेच याप्रसंगी बोलताना मुकुंद म्हेत्रे म्हणाले की, शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे स्थानिक पातळीवर उपलब्ध होणेसाठी शेतकर्यांनी प्रत्येक हंगामामध्ये ग्राम-बिजोत्पादन कार्यक्रम राबवणे गरजेचे असून शेतकर्यांनी स्वत:चे बियाणे निर्माण केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. सोयाबीनच्या पेरणीच्या वेळी जैविक व रासायनिक बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी, असे म्हेत्रे यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी कृषि सहाय्यक निलेश किरतकुडवे, यांनी सोयाबीनची पेरणी करताना बी.बी.एफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास उत्पादनात वाढ निश्चितच होते. तसेच सोयाबीन पीकातील खतमात्रा व इतर उत्पादन सुत्रांची माहिती दिली. गटाचे प्रवर्तक अजित वसव यांनी गटामार्फत सदरचे बियाणे बारामती येथील ‘प्रतिभा फार्मस प्रोडूयसर कंपनी’ येथून मागवण्यात आले असून हा कार्यक्रम 20 हेक्टरवरती क्षेत्रावरती राबविणार येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्यावेळी निढळ गावातील उपसरपंच श्रीकांत खुस्पे, सुनील शिंदे, नासीर शेख, नवनाथ खुस्पे अमित खुस्पे उपस्थित होते.