पिंपोडे बुद्रुक, दि. 7 (वार्ताहर) ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमी डॉ.प्रा. नितीन मोहिरे यांच्या संकल्पनेतून आज वाठार पोलीस स्टेशन परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्याहस्ते ’बेलाचे’ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. सामाजिक जाणिवेतून डॉ. नितीन मोहिरे यांनी 2007 मध्ये गेली पंधरा वर्ष झाली. या वृक्षारोपण संकल्पनेची सुरुवात केली दिवसात एकतरी झाड लावले जाते. त्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक चिंच, जांभूळ, बेल, शिवरी, वड, पिंपळ, रानवड व देशी, औषधी वनस्पतीची वृक्षांची लागवड केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवाजीराव एस. जोंधळे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असणारे डॉ. मोहिरे यांनी त्या परिसरात शासकीय, सार्वजनिक ठिकाणी, रस्ता आणि उपलब्ध होईल, अशा प्रत्येक ठिकाणी हजारो झाडे लावली आहेत. लॉकडाऊन व कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे सुभाषनगर, कोरेगाव येथे मूळगावी आले आहेत.
मात्र, याठिकाणी सुद्धा कोरेगाव शहराच्या भोवतालच्या परिसरात व लॉकडाऊनच्या प्रत्येक दिवसात, मित्र परिवार अनेक सगेसोयरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य आणि सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपण व निसर्गाच्या सान्निध्यात राहून दररोज नित्यनियमाने झाडे लावत आहेत.
विशेष म्हणजे या उपक्रमात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी होऊन डॉक्टर यांना या उपक्रमात साथ देत आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज जागतिक दिनाचे औचित्य साधून वाठार पोलीस स्टेशनच्या परिसरात असणार्या साईबाबांच्या मंदिराशेजारील पोलीस अधिकारी स्वप्नील घोंगडे यांच्या हस्ते ’बेलाचे’ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ट्रिपल लेयर वॉटर रिप्लेट मास्क, जलनेती पोट व आय वॉश कप इत्यादीचे प्रात्यक्षिक,योग्य वापराबाबत माहिती व वाटप केले.यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.