म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.
म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात आणखी 5 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, म्हसवड शहराची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.
शहरातील यापूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अन्य लोकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह येऊ लागल्याने शहरातील बाधितांचा आकडा हा वाढू लागला आहे. दररोज वाढणारे आकडे हे शहरवासीयांची चिंता वाढवत आहेत. म्हसवड शहरातच कोरोनाची प्राथमिक टेस्ट होत असल्याने दररोज याठिकाणी बाधितांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जावू लागल्याने शहरातील बाधितांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तर शहरातील पॉझिटिव्ह व्यक्तीला मायणी, सातारा आदी ठिकाणी असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात येत असले तरी बाधितांच्या कुटुंबीयांना याबाबतचे गांभीर्य वाटत नसल्याचे दिसून येते. बाधिताच्या घरातील इतर सदस्य मोकाटपणे बिनधास्त शहरात इतरत्र फिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र याबाबत पोलीस, पालिका व आरोग्य विभाग गप्प आहे. शहरातील आम्ही म्हसवडकर नावाचा असलेला युवकांचा ग्रुप मात्र याबाबत फारच आक्रमक असला तरी त्यांना काही बाबतीत मर्यादा असल्याने मोकाटांना आळा घालणार कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, दि. 23 रोजी आलेल्या अहवालानुसार येथील शिवाजी चौक येथील 26 वर्षीय युवक, आंबेडकरनगर येथील 60 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक अशा 5 जणांना कोरोनाची बाधा झाली असून आजअखेर म्हसवड शहरात कोरोनाचे 83 रुग्ण झाले आहेत.
एका महिन्यात झपाट्याने वाढली रुग्ण संख्या
गत एका महिन्यापूर्वी संपूर्ण माण तालुक्याची आकडेवारी ही शतकाकडे जाणारी होती. त्यावेळी तालुका प्रशासन हडबडले होते. मात्र, अवघ्या एका महिन्यातच एकट्या म्हसवड शहरातील बाधितांचा आकडा हा 80 पुढे गेला असून, पुढील काही दिवसांतच तो शतकपूर्ती करेल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे.
म्हसवड शहरात 5 दिवस जनता कर्फ्यू
म्हसवड शहरातील वाढत जाणारी कोरोनाची साखळी रोखण्यासाठी सर्व म्हसवडकरांनी एकत्र येत दि. 24 ते 29 ऑगस्ट असा सलग 5 दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला असून, या काळात शहरातील फक्त मेडिकल्स व दवाखाने वगळता सर्व काही बंद राहणार आहे. या जनता कर्फ्यूचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे याकरिता शहरातील नगरसेवक व समाजसेवकांनी एकत्र येत दोन दिवसांपूर्वीच शहरवासीयांना आवाहन केले असून, या 5 दिवसांत जर कोणी आपले दुकान सुरू ठेवले अथवा विनाकारण एखादा रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई निश्चित होणार आहे.