दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, दानवली गावचे शासकीय रेशन धारकाकडून आज या महिन्याचे शिधावाटप होत असताना गहू व तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे आहेतच; परंतु त्यामध्ये कचरा, कोंबड्यांची पिसे अशा प्रकारचे घाण धान्य असल्याने आज नागरिक संतप्त झाले. व हे धान्य घेण्यास नागरिकांनी नकार दिला.
शासनाने दिलेले हे धान्य अशा निकृष्ट दर्जाचे असेल तर सध्या कोरोना काळ असल्याने प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना अशा प्रकारे या आणीबाणीच्या काळात आजारांमध्ये वाढ झाल्यास याला जबाबदार कोण?, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. आधीच आम्ही जीव मुठीत घेऊन जगत आहोत आणि जर अशी आमची थट्टा केली जात असेल तर मात्र आमचे दुर्दैव म्हणावे लागेल.
हे धान्य खरोखरंच शासकीय गोदामातून आले की हे बदलून दिले याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने याची दखल घेऊन नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य वाटावे, अन्यथा शासकीय योजनेतील धान्य पुरवठा झाला नाही तरी आम्ही मरणार नाही, अशी आर्त भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे रेशन वाटप करण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदाराला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये शासकीय योजनेला हरताळ फासला जात असल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.