महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज येथे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस कोल्हापूर विभाग शिंत्रे यांच्या हस्ते ज्या हायवे वॉरियर्स मृत्युंजय दूत यांनी अपघातामध्ये जखमींना तत्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, अशा मृत्युंजय दूतांचा फुलाचे झाड व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
भुईंज : महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज येथे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस कोल्हापूर विभाग शिंत्रे यांच्या हस्ते ज्या हायवे वॉरियर्स मृत्युंजय दूत यांनी अपघातामध्ये जखमींना तत्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, अशा मृत्युंजय दूतांचा फुलाचे झाड व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिंत्रे म्हणाल्या, ‘प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताचे प्रमाण कमी होईल. दुचाकीस्वार यांनी हेल्मेट सक्तीने वापरणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या गोष्टीवर तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. ज्यावेळी अपघात होतो, त्याप्रसंगी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत हवी असते. अशावेळी जो कोणी मदतीला धावून येतो व त्यांचे प्राण वाचवतो, तो त्यांच्यासाठी मृत्युंजय दूत म्हणून सामोरे येतो. अशावेळी बरेच लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत उभे असलेले दिसून येतात, पण बघ्याच्या भूमिकेतल्या एकाच्याही मनात येत नाही की, अपघातग्रस्तांचा प्राण वाचवा, कारण त्यांना असे वाटते की गुन्हेगार म्हणून आपल्यालाच शिक्षा भोगावी लागेल या भीतीपोटी मदतीस धावून कोणी येत नसल्याचं दिसून येतं. परंतु आता नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता अपघातग्रस्तांना तत्काळ मदत देऊन त्यांचे प्राण वाचवणे हे पहिले कर्तव्य करणे गरजेचं आहे. तुम्ही एका माणसाचा जीव वाचवला म्हणजे त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तींचा आशीर्वाद मिळतो.’
यावेळी संजय बबन मोरे, करण सुनील राजे (रा. पाचवड), जयसिंग ज्ञानोबा फरांदे, सुधीर दत्तात्रय गोरे, पो. पाटील दीपक गिरीगोसावी, सत्यम मांढरे (रा. आनेवाडी), लखन किसन जाधव (रा. लिंब (ढगेवाडी), विजय महादेव खडसरे (रा. वेळे) या सर्व मृत्युंजय दूतांचा सत्कार करण्यात आले.
अशा प्रोत्साहनपर कार्यक्रमामुळे जखमींना तातडीची मदत मिळणे सोपे होईल, यामुळे मृत्यूदर पण घटेल. यावेळी भुईंज वाहतूक पोलीस सपोनि दत्तात्रय गुरव व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.