माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
नरवणे : माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
तसेच या पावसाने काही ठिकाणी कांदा पिकाच्या शिवारात भरपूर पाणी साचल्याने पाण्यातूनच शेतकर्यांना कांदा बाहेर काढावा लागत आहे. यावर्षी बाजरी पिकाला अनुकूल वातावरण असल्याने या परिसरामध्ये बाजरीचे पीक चांगल्या प्रमाणात आले होते. परंतु, काल झालेल्या अति पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
या पावसामुळे परिसरातील आजूबाजूचे ओढे-नाले तुडुंब भरून शिवारात पाणी घुसले आहे. सध्या या पाण्यातून कांदा बाहेर कसा काढावा किंवा बाहेर काढलेला कांदा आता लवकरच सडून जाणार या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
त्याचबरोबर या अतिवृष्टीमुळे नरवणे परिसरातील बरेचशे पाणंद रस्ते खचून शेतकर्यांची शेतामध्ये ये-जा थांबली आहे. दक्षिणेकडील माती नालाबांध फुटले असून, सिमेंट माती नालाबांध सुद्धा वाहिले आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काटकर वस्ती, दोरगेवाडीकडील रस्ता खचल्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. याचबरोबर नुकताच झालेला गणेश घाट हादेखील पाण्याखाली जाऊन बरेचसे नुकसान झाले आहे.
दहिवडीकडून कुकुडवाडकडे जाणारा रस्ता नरवणे गावच्या ओढ्यावर भरपूर पाणी असल्याने रात्रभर तसेच आज दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद होता.