करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
वाई : करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
येथील बाजार समितीच्या सभागृहात गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक संजय मोतेकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत आदी उपस्थित होते.
अजित टिके पुढे म्हणाले, गणेश उत्सवाबाबत शासनाने जी नियमावली दिली आहे, तिचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती ही चार फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये. आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये भपकेपणा असू नये. गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून फेसबुक व व्हिडीओ माध्यमांचा वापर करावा. गणेशोत्सवात होणारा खर्च हा गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, विटामिन सी, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या व गरजूंना धान्य वाटप आणि करोना बाधितांवरील उपचारासाठी खर्च करावा. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत. गणेश आगमनापूर्वी गणेश मंडळांनी धर्मादाय संस्थेकडून परवानगी काढावी. त्यासाठी लागणारी पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रास्ताविक केले. शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत करोना रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवत उत्सव साजरा करावा. गणेश उत्सवासाठी यावेळी मंडप घालू नये, आरती वेळी फक्त चार कार्यकर्ते असावेत. दररोज कार्यकर्ते बदलण्यात यावेत.करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उत्सव साजरा करावा असे सांगितले.
नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांनी परंपरेप्रमाणे धार्मिक वातावरणात उत्सव साजरा करावा. मात्र, कोरोना संसर्गामुळे आज समाजातील अनेक घटक अडचणीत आहेत त्यांना मदत करावी. उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी तालुक्यातील व शहरातील गणेश मंडळांनी करोना बाधीत रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत. त्यांना मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, काशिनाथ शेलार, रवी बोडके आदी उपस्थित होते.