पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू केल्याने फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करीत असून स्थानिक प्रशासनानेही नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
पाचगणी पालिकेने शहरात बाजारपेठ, हनुमान गल्ली, गावठाण, मंडई, सिद्धार्थनगर, आंबेडकर कॉलनी, भीमनगर, शाहूनगर, शांतीनगर या विरळ वास्तव्याच्या व गर्दीच्या ठिकाणांवर ही निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली आहे. घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावर विषाणू नसावा. रस्त्यावरचा विषाणू घरात जाऊ नये यासाठी प्रभागातील अंतर्गत रस्ते व अंगणात ही फवारणी करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे स्वागत व सहकार्य केले.
कोरोना विषाणूजन्य आजार असून श्वसनरोग आहे. हा आजार माणसं शिंकली, खोकली तर त्यामुळे उडणार्या तुषारांमुळे पसरतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू बराच काळ टिकून राहतात. त्यामुळे अशा दूषित पृष्ठभागाशी थेट संपर्क आल्यास आजार संक्रमित होऊ शकतो. मात्र, या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी रासायनिक जंतुनाशकांचा वापर करणे सर्वात परिणामकारक आहे. या प्रभावी उपायामुळेच सर्वजण संक्रमणापासून दूर राहू शकणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत शहराचा संपूर्ण परिसर फवारून पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.