वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
वाई : येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाई पोलिसांनी शुक्रवारी संबधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील ब्राम्ह समाजाची इमारत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने शाळेकरिता भाडेतत्वावर घेतली होती. या इमारतीत गेली अनेक वर्षापासून गर्ल्स हायस्कूल चालवले जाते. ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल साबळे व त्याचे पती राजेंद्र साबळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र मिळवून सुट्टी (रविवार, दि. 14) दिवशी शाळेचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून साबळे पती-पत्नी व अन्य सात ते आठ लोकांच्या मदतीने इमारत पाडली. शाळेचे शैक्षणिक साहित्य ट्रक्टरमध्ये घेऊन जात असताना शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा हरिश्चंद्र ठोंबरे व त्याचे पती याच दरम्यान शाळेच्या समोरून जात होते. त्यांना शाळेचे कुलूप तोडल्याचे दिसून आल्यानंतर ते आतमध्ये गेले असता त्यांना साबळे पती-पत्नी व अन्य सात ते आठ लोक शैक्षणिक साहित्य ट्रक्टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. ठोंबरे व त्यांच्या पतींना रोखून धरले तर अन्य सात ते आठ अनोळखी व्यक्तींनी शाळेचे संगणक, लाकडी टेबल, खुर्च्या महत्वाची कागदपत्रे, शाळेचे दप्तर आदी शैक्षणिक साहित्य नेले. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ठोंबरे पती दाम्पत्य तेथून पळून गेले व याबाबतची माहिती संस्थेचे सहसचिव राजेंद्र शेजवळ यांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापिका ठोंबरे वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर तक्रार घेतली नाही. यामुळे शाळा व्यवस्थापनाने पोलीस अधीक्षक व न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.