माण-खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांची बिले देताना प्रशासनाने आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत. तसेच या कार्यालयांतील विविध कामे दलालांमार्फत केली जात असून, त्याबाबतची तक्रार जिल्हास्तरावर करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रकरणांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली आहे.
बिजवडी : माण-खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांची बिले देताना प्रशासनाने आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत. तसेच या कार्यालयांतील विविध कामे दलालांमार्फत केली जात असून, त्याबाबतची तक्रार जिल्हास्तरावर करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रकरणांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली आहे.
माण तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालयांच्या आणि अधिकार्यांच्या विश्वासार्हतेवर नुकताच विधानसभेतही प्रश्न विचारला गेला होता. त्याचबरोबर लाचलुचपत खात्याच्या कारवाईत देखील तालुका वरिष्ठ कार्यालयाचा सहभाग होता, अशी चर्चा होती. तसेच या कार्यालयातील मिस्टर अधिकारी वाळूमाफियांची वसुली करत असल्याचे मी वर्तमानपत्र व सोशल मीडियात जाहीरपणे मांडले होते.जनावरांच्या चारा छावण्यांची बिले अदा करताना महसूलच्या अधिकच्या टक्केवारीचा विषय सध्या फारच चर्चिला जात असतानाच चारा छावण्यांत खोटी जनावरे दाखवून शेतकरी व शासनाची केलेली फसवणूक आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशीही मागणीही केली होती.
वरील दोन्ही विषयांच्या लेखी तक्रारी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे स्वातंत्र्यदिनादिवशी केल्या. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली न दिसून आल्यामुळे पुन्हा जिल्हाधिकारी सातारा यांची भेट न झाल्याने दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी या विषयांचा गांभीर्याने विचार व्हावा म्हणून पुन्हा लेखी स्मरणपत्र निवासी उपजिल्हाधिकारी सातारा यांना दिले.
वरील सर्व घटनाक्रम पाहता 6 जुलै 2020 रोजी वाळू प्रकरण आणि दलालीचे आरोप तसेच शेतकर्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करायला का वेळ लागतोय आणि याच्याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने का पाहत नाही.
या प्रकरणाची जिल्हास्तरावर दखल घेतली जात नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.