‘महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.
पाचगणी : ‘महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ज्यामध्ये 60 वर्षावरील सर्व नागरिक व 45 ते 59 वयोगटातील ज्यांना रक्तदाब व मधुमेह व इतर गंभीर आजार असतील यांना लस देण्याचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई कदम, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी सुनील पार्टे, रोटरी अध्यक्ष किरण पवार, जयवंत भिलारे, शारोम जवामर्दी, राजेंद्र खरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, जयवंतराव चौधरी, भारत पुरोहित, शशिकांत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील ज्यांचे वय 60च्या वर आहे आहे व 45 वर्षे वरील ज्यांना इतर आजार आहेत, त्यांनी प्राधान्याने लस घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. कदम यांनी करून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा दि. 1 मार्च रोजी संपूर्ण देशामध्ये सुरू झाला आहे, ज्यामध्ये 60 वर्षावरील सर्व नागरिक व 45 ते 59 वयोगटातील ज्यांना रक्तदाब व मधुमेह व इतर गंभीर आजार असतील यांना ही लस उपलब्ध आहे.
हे लसीकरण सुरू झाले असले तरी तालुक्यातील काही ठिकाणी गैरसमजुतीमुळे लोक पुढे येण्यास धजावत नाहीत काही गैरसमजुती व कारणे बाजूला ठेवून या कोरोनाच्या लढ्यात सहभागी व्हावे व कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन हातभार या चळवळीस लावावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.