‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने किल्ले वारूगड (ता. माण) येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवत शैक्षणिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बिजवडी : ‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने किल्ले वारूगड (ता. माण) येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवत शैक्षणिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
किल्ले वारूगड (मठवस्ती) येथील श्रीनाथ विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमांतर्गत वारुगडमधील पाच अंगणवाड्यांना पाण्याचे फिल्टर व त्यासोबत अंगणवाडीतील लहान मुलांच्या वैचारिक प्रबोधनाकरिता ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. तसेच या उपक्रमांंतर्गत शालेय ग्रंथालयासाठी ऐतिहासिक पुस्तके, कादंबर्या, थोर पुरुषांचे आत्मचरित्र यांसारख्या शेकडो पुस्तकांचा संच ग्रंथालयास भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद हे ‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपचे प्रा. दत्तात्रय भपकर यांनी भूषवले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व पाण्याचे संवर्धन या विषयावर व्याख्यान दिले. बिदाल गावचे इतिहास अभ्यासक रावसाहेब देशमुख यांचेही शिवकर्तृत्वावर व्याख्यान झाले.शालेय विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम शाहीर धनाजी शेडगे यांनी सादर केला.
प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका गावित यांच्यामार्फत ‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपचा छोटासा सत्कार करण्यात आला व त्यावेळी वृक्ष रोपणाचा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपचे सन्मान चिन्ह शाळेला भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षक, विद्यार्थी, तसेच वारुगड ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शाळेचे मुख्याध्यापक शिंदे व काटकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयाचे शिक्षक गोडसे व वारुगडचे शाहीर धनाजी शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.