पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.
पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाचगणी वरून महाबळेश्वरकडे जाणारी निळ्या रंगाची अल्टो कार क्र. (एमएच 03 के 8292) ही कार प्युअर बेरी फॅक्टरी समोर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव असणारी गाडी रस्त्याच्या कडेला असणार्या झाडावर आदळली.
ही धडक इतकी जोरदार होती की गाडी झाडावर आदळल्याने ती पुन्हा पाचगणीच्या दिशेने फिरली. गाडीत असणारे महाबळेश्वर येथील शुभम सुभाष फळणे (वय 25), नयन सुनंदा सपकाळ (वय 24) व शेखर कुरुंदे (वय 24, सर्व रा. महाबळेश्वर) हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पाचगणी येथील एसओएस टीमचे सदस्य मेहुल पुरोहित, निहाल बागवान, सुनील उंबरकर, सचिन वाडकर, अजित कासुर्डे, किरण जानकर या ठिकाणी तत्काळ दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच शेजारीच असणार्या व्हेलोसिटीचे मालक दोराब दुबाश हे देखील तातडीने दाखल झाले. अपघातातील तिघेही गाडीत अडकल्याने त्यांना बाहेर काढणे मुश्कील झाले. लागलीच दुबाश बाबा व त्यांच्या कामगारांनी लांब विजेची वायर आणून कटर साहाय्याने दरवाजा कापून या सर्वांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. 108 या रुग्णवाहिकेसाठी कॉल केला असता रुग्णवाहिका पाऊण तासाने आली. मात्र, त्यात डॉक्टर नसल्याबाबत स्थानिकांनी सांगितले. एसओएस टीमच्या सदस्यांनी 108 रुग्णवाहिकेतून जखमींना पाचगणी येथे उपचारासाठी आणले; परंतु तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना सातारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
या भीषण अपघातात तीन तरुण गंभीर अवस्थेत गाडीत अडकून पडले होते. त्यांना मदतीची गरज असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, त्यांना मदत करण्याचे सोडून या राज्य मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक अपघात ठिकाणी न थांबता निघून जात होते. येथे माणुसकी हरवली होती की काय? हा विदारक क्षण खरोखरच हृदय पिळवटून टाकणारा होता.
आ. मकरंद पाटील यांची तत्परता..
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे आ. मकरंद पाटील हे महाबळेश्वर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी अॅम्ब्युलन्स लवकर येण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक नितीन काका पाटील यांनी थांबून या ठिकाणी अपघातग्रस्तांची विचारपूस केली.