येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर बुधवारी 10 अशा एकूण 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 494 वर पोहोचली आहे.
महाबळेश्वर : येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर बुधवारी 10 अशा एकूण 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 494 वर पोहोचली आहे.
मंगळवारी 26 व्यक्तींच्या कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये गोडवली येथील 15, महाबळेश्वर येथील पालिका कर्मचारी दोन व त्यांचे नातेवाईक एक, रांजणवाडी येथील 4, पाचगणी शहर 1, वाळणे येथील 2 तर संभाजीनगर येथील 1 एका व्यक्तीचा समावेश आहे तर आज सकाळी आलेल्या अहवालात आठ व रॅपिड अॅन्टीजेन टेस्टनुसार दोन अशा एकून 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालानुसार पंचायत समितीमधील एका अधिकार्याबरोबरच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे.
आज कोरोनाबाधित झालेले पंचायत समितीचे अधिकारी हे गेली अनेक महिने ग्रामीण भागात धडाडीने नियोजनबद्ध कोरोना विरोधातील लढाईत अग्रेसर राहिले आहेत. तालुक्यात कोरोना प्रवेश करण्यापूर्वी पासूनच गावागावात ग्राम समिती, ग्रामसेवक यांच्या समन्वय ठेवून तालुका स्तरावर काम करणारे अधिकार्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप करून कोरोना विरोधातील लढाईत निकराने भाग घेतला होता. तालुक्यातील 110 गावांपैकी 75 गावे ही कोरोनामुक्त राखण्यात याच पंचायत समितीमधील अधिकार्यांचा मोठा हात आहे.
ग्राम समिती असो अथवा गावातील कार्यकर्ते असो प्रतिबंधात्मक उपायायोजना राबवून सर्वांना कोरोनाबाबत कोणती खबरदारी घ्यायची, याचा प्रसार-प्रचार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. गावातील लोकांना मास्क पुरवणे, गाव औषध फवारणी करून निर्जंतुक करणे, गोरगरिबांना अन्नधान्याचे कीट पुरवणे, अशा पद्धतीने काम करून तालुक्यात पंचायत समितीच्या कामाचा ठसा उमटवणार्या अधिकार्यांना कोरोनाने गाठल्याने पंचायत समितीत चांगलीच खळबळ माजली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 494 वर पोहोचली आहे. यापैकी 126 कोरोना रुग्णांवर आजही उपचार सुरू आहेत तर 360 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.