बनगरवाडी, ता. माण येथील रॉयल क्लबच्या तरुणांनी क्रिकेट स्पर्धेसाठी जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत कार्यालयातच सुसज्ज ग्रंथालय थाटल्याने, वाडी-वस्त्यांवर राहून हलाखीत महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या विधायक कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांंच्या अभ्यासासाठी उपयोगी पुस्तके, माहिती आणि ग्रंथ साहित्याचा यामध्ये समावेश करून, रात्रंदिवस खुल्या राहणार्या ग्रंथालयामुळे शाळकरी तरु
वरकुटे-मलवडी : बनगरवाडी, ता. माण येथील रॉयल क्लबच्या तरुणांनी क्रिकेट स्पर्धेसाठी जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत कार्यालयातच सुसज्ज ग्रंथालय थाटल्याने, वाडी-वस्त्यांवर राहून हलाखीत महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या विधायक कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांंच्या अभ्यासासाठी उपयोगी पुस्तके, माहिती आणि ग्रंथ साहित्याचा यामध्ये समावेश करून, रात्रंदिवस खुल्या राहणार्या ग्रंथालयामुळे शाळकरी तरुणांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
खेड्या-पाड्यातील तरुणांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळातून एकात्मता, शारीरिक विकास साध्य व्हावा याकरिता प्रत्येक वर्षी लोकवर्गणी गोळा करून, खुल्या माळरानावर सहा-सात दिवसांच्या टेनिस बॉलवर भव्य क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याची बनगरवाडी येथील तरुणांची फार जुनी परंपरा आहे. त्यानुसार सुट्टीच्या कालावधीत या स्पर्धेचे नियोजन करण्यात येते.
यंदाही देवापूर, जांभुळणी, वरकुटे-मलवडी, महाबळेश्वरवाडी, काळचौंडी, वळई, पालवन, शेनवडी, म्हसवड, दिघंची आदी परिसराच्या गावांतील क्रिकेट संघांच्या सहभागातून चांगल्या प्रकारे क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.
मात्र, स्पर्धेतून उरलेल्या रकमेचे करायचे काय? यावर सर्व तरुणांनी एकमत करून ग्रंथालय उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आणि गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत सुसज्ज ग्रंथालय थाटून अनमोल असे कार्य साध्य केल्याने रॉयल क्लबच्या तरुणांचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, सरपंच वंदना बनगर, महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, मार्केट कमिटीचे संचालक विजयकुमार जगताप, माजी सरपंच भारत अनुसे, वैभव शिंगाडे, युवा नेते विक्रम शिंगाडे, उपसरपंच सागर बनगर, भागवत अनुसे, अमोल शिंगाडे, बाजीराव बनगर, बापूराव बनगर आदींनी अभिनंदन केले.