कालेटेक येथून चोरीस गेलेल्या स्टीलचा तीन तासात छडा
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः कालेटेक ता. कराड येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टील चोरणाऱ्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे तीन लाख 90 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुखदेव सर्जेराव मोरे (मूळ रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. कालेटेक, ता. कराड) असे चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कालेटेक ता. कराड येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील 90 हजार रूपये किमतीचे दीड टन वजनाचे स्टील चोरीस गेले होते. याबाबतची तक्रार विकास जगन्नाथ पाटील यांनी शनिवारी कराड ग्रामीण पोलिसात दिली होती. त्या अनुषंगाने डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याअनुषंगाने पोलिसांनी पाचवड फाटा येथे सापळा लावला. सुखदेव मोरे हा चोरीचा माल विक्रीकरीता घेऊन जात असताना पोलिसांनी पाचवड फाटा येथे त्याचे वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 3 लाख 90 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार उत्तम कोळी करीत आहेत.