येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.
महाबळेश्वर : येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढू लागले आहेत. येथील लहान घरे असलेल्या कुटुंबातील जर कोणाला कोरोनाची लागण झाली तर त्यांची घरात स्वतंत्र सोय करणे शक्य होत नाही, अशा लक्षणे नसलेल्या व विलगीकरणाची घरी गैरसोय असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या सोईसाठी नगराध्यक्षा यांनी विलगीकरणाची सोय केली होती. परंतु, या कक्षात दाखल होण्यासाठी पाच हजार रूपये भरावे लागणार होते. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला असून, अनेकांचे रोजगार बंद आहेत अशा स्थितीत विलगीकरण कक्षासाठी पाच हजार रुपये भरणे कठीण होणार असल्याने अशा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी येथील माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका यांनी विलगीकरणासाठी आपले संपुर्ण हॉटेल पालिकेच्या स्वाधिन केले आहे.
येथील सुभाष चौकात प्रेसिंडेट नावाचे पारठे यांचे हॉटेल आहे. विलगीकरण कक्ष सुरू करण्यापूर्वी तेथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे, याची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.
यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेविका विमलताई पारठे, शारदा ढाणक, स्नेहल जंगम, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, अॅड. संजय जंगम, रोहित ढेबे, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, संजय दस्तुरे उपस्थित होते.
हॉटेलमध्ये दोन दिवसांत विलगीकरण कक्षाचा प्रारंभ करणार असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी यांनी दिली.
विलगीकरणासाठी नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले हॉटेल मोफत दिल्याचे पाहून या विलगीकरण कक्षात दाखल होणार्या कोरोना बाधित रुग्णांची नाश्ता चहा व जेवणाची मोफत सोय करण्याचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी यावेळी जाहीर केले. कोरोना बाधित रुग्णांच्या सोईसाठी पालिकेच्या दोन नगरसेवकांनी दाखविलेल्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.