अधिकार्यांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पुट्ट्यातील माणमधील पळशी गावचे सुपुत्र नितीन दादासो हांगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दोन वेळा जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त करून पळशी गावासह शेतकरी असलेल्या आई-वडिलांचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. एकंदरीत एमपीएससी परीक्षेत नितीन हांगे यांची डबल हॅट्ट्रिक केली आहे.
दहिवडी : अधिकार्यांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पुट्ट्यातील माणमधील पळशी गावचे सुपुत्र नितीन दादासो हांगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दोन वेळा जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त करून पळशी गावासह शेतकरी असलेल्या आई-वडिलांचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. एकंदरीत एमपीएससी परीक्षेत नितीन हांगे यांची डबल हॅट्ट्रिक केली आहे.
नितीन हांगे यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा व माध्यमिक शिक्षण श्री हनुमान विद्यालय पळशी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हे दहिवडी कॉलेज दहिवडी येथे झाले आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने जिद्दीच्या जोरावर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 2006 मध्ये ते ठाणे शहर पोलीस दलात भरती झाले. गावातील इतर अधिकार्यांच्या प्रमाणे आपला मुलगाही पोलीस अधिकारी व्हावा, अशी त्यांच्या शेतकरी आई-वडिलांची इच्छा होती. आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पोलीस दलातील खडतर नोकरी व अभ्यास याचे संतुलन साधून त्यांनी पहिल्यांदा 2016 मध्ये झालेल्या परीक्षेत यशाला गवसणी घातली. परंतु काही प्रशासकीय कारणांमुळे त्यांना प्रशिक्षण कामी पाठवण्यात आले नव्हते.
त्यामुळे त्यांनी 2017 मध्ये देखील जिद्द व चिकाटी न सोडता पुन्हा नव्याने तयारी करून एमपीएससीची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच 10 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर झाला असून, त्यामध्ये त्यांची महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातून 71व्या क्रमांकाने निवड झाली आहे.
प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर यश कसे शक्य मिळवावे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सलग दोन वेळा निवडीच्या यशाबद्दल त्यांचे ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.