शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या-त्या गावातील ग्रामस्तरीय दक्षता समितीने 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
निढळ : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या-त्या गावातील ग्रामस्तरीय दक्षता समितीने 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून उत्तर खटावमधील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. तरी खबरदारी म्हणून गाव बंद ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. उत्तर खटाव भागातील या गावांमध्ये आसपासच्या भागातील नागरिकांची वर्दळ या ठिकाणी नेहमी पाहायला मिळते. पण या कालावधीत सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. फक्त औषध दुकाने, दवाखाने आणि दूध संकलन केंद्रे सुरू आहेत.
नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन यांच्याकडून विनाकारण ये-जा करणार्या नागरिकांची चौकशी होत आहे. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच सूट देण्यात येत आहे.
या सर्व घडामोडीमध्ये सर्वसामान्य मात्र घाबरून गेला आहे. वाड्या-वस्त्या चिडीचूप झाल्या आहेत.सर्वत्र भीती व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेला आता पैसे कमवण्यापेक्षा जीवाचे महत्त्व वाटू लागले आहे. त्यामुळे लोक स्वतःहून नियम पाळताना दिसत आहेत. या जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण उत्तर खटाव नि:शब्द व शांत झाला आहे.
तालुक्याच्या मुख्य ठिकाण असलेल्या वडूजमध्ये ही जनता कर्फ्यू असल्यामुळे खटाव तालुका एकदम शांत झाला आहे. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आता गावकरी आपापसातील मतभेद विसरून एक होऊ लागले आहेत. सर्वजण गावची काळजी करू लागले आहेत व लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे लोकही आता नियमांचे पालन करू लागले आहेत.