शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाबळेश्वर : शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी नगरसेवक कुमार शिंदे हे देखील उपस्थित होते
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रयत्न करून ही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णांसाठी बेड शोधण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. कोरोनाची लागण झाली आहे, परंतु कोणतीही लक्षणे दिसत नाही अशा रुग्णांना विलगीकरणात राहण्यास सांगितले जात आहे. परंतु अनेक कुटुंबात अशी स्वतंत्र सोय करणे अशक्य होत आहे, अशा रुग्णांसाठी मागील वर्षी येथील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले होते. परंतु आता ते सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
या संदर्भात अनेक नागरिकांनी पालिकेला कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा पालिकेने गांभीर्याने विचार करून लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भटकंती होऊ नये, यासाठी तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विलगीकरणाची सोय करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता सध्या दोन हॉटेल पालिकेने ताब्यात घेतली आहेत. मागणीनुसार आणखी दोन हॉटेल पालिका ताब्यात घेऊन तेथेही विलगीकरण कक्ष सुरू करणार असल्याची माहिती देऊन नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, विलगीकरण कक्षात प्रवेश मिळावा यासाठी पालिकेने नाममात्र फी ठेवली आहे. 17 दिवसांच्या सोईसाठी कोरोनाबाधित रुग्णांना 5 हजार रुपये आकार ठेवण्यात आला आहे. या पाच हजार रुपयांत 17 दिवस निवासाची सोय त्याचबरोबर दोन वेळचा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. याशिवाय एक होम आयसोलेशन किट देण्यात येणार आहे. या आयसोलेशन किटमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत.ऑक्सिमीटर, थर्मामीटर, हातमोजे, मास्क, साबण, सॅनिटायझर आदी वस्तू या किटमध्ये असणार आहेत. पालिकेच्या वतीने रोज डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना आवश्यकतेनुसार औषधे दिली जाणार आहेत. विलगीकरण कक्षात प्रवेशासाठी रुग्णांनी अथवा नातेवाइकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व लिपिक यांच्याशी संपर्क साधा.