‘बचतगट चळवळीने महिलांना दिलेली शक्ती महत्त्वाची आहे. या शक्तीतून एकत्र आलेल्या भीमजननी बचतगटास भक्कम पाठबळ देऊ. महिलांनी निर्भयपणे आणि एकजुटीने काम करावे. काही अडचण आल्यास पोलीस दल महिलांच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी दिली.
भुईंज : ‘बचतगट चळवळीने महिलांना दिलेली शक्ती महत्त्वाची आहे. या शक्तीतून एकत्र आलेल्या भीमजननी बचतगटास भक्कम पाठबळ देऊ. महिलांनी निर्भयपणे आणि एकजुटीने काम करावे. काही अडचण आल्यास पोलीस दल महिलांच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी दिली.
भुईंज येथील भीमजननी बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र जानवे-खराडे यांच्या हस्ते अध्यक्षा सविता गाडे, उपाध्यक्षा उज्ज्वला कांबळे यांना प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
जानवे-खराडे म्हणाल्या, ‘बचतगटाच्या सदस्यांचे कौतुक करावे लागेल. येथील महिला खंबीर, कर्तबगार असून पोलीस दलाला त्यांचे नेहमी सहकार्य असते. चांगल्या कामात नेहमी अडथळे येतात, आणले जातात. मात्र, अशा प्रसंगी पोलीस दल सहकार्य करेल.’
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सरपंच पुष्पा भोसले, माणदेशी फाउंडेशनच्या विद्या किर्वे, महिला दक्षता समितीच्या सदस्या प्रबोधिनी तांबोळी, रंजना खरे, उद्योजिका वनिता धिवर, आशा जाधव, अंगणवाडी सेविका एरंडे, बचत गटाच्या सचिव जयश्री कांबळे, सर्व सदस्या, महिला आदी उपस्थित होते.
मीरा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.