माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.
दहिवडी : माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक भरत विजय कुलकर्णी, कुमार लिंबाजी कोरे यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील नागरिकांनी जीव मुठीत धरून बाहेर धाव घेतली. घटनास्थळी गावातील कृष्णा शिंदे, संग्राम शिंदे, रोहित शिंदे, आकाश शिंदे, गणेश शिंदे, चैतन्य भोंडवे, सुहास सावंत यांनी पाण्याचा टँकर बोलवून आग विझविण्यास प्रयत्न केले. मात्र, त्या ठिकाणी गॅस सिलिंडर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर गॅस सिलिंडर बाहेर काढल्यानंतर पुन्हा ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.
या आगीत तीन खोल्या जळून खाक झाल्या आहेत तर आग विझविल्याने एका खोलीचे नुकसान टळले आहे. तर आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून गेले आहे. यामध्ये सुमार चार लाखांचे नुकसान झाले आहे.