पत्र्याचा आवाज का करतोस म्हणून सुपनेत एकाचा खून
News By : Muktagiri Web Team
कराड, दि, 12 ः पत्र्याचा आवाज का करता असे म्हणून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाच्या दांडक्याने मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सागर दिनकर चव्हाण (वय 25, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनकर चव्हाण असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सुनिल दत्तू पवार (वय 55), कविता सुनील पवार (वय 45), काजल पिंटू पवार (सर्व रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सागर चव्हाण त्याचा भाऊ, आई-वडील हे सध्या सुपने येथे जयवंत पाटील यांचे गुन्हाळावरती ऊस घालण्याच्या कामासाठी मजुरीवर कामास आले आहेत रविवारी रात्री 10.30 वाजणेच्या सुमारास दिनकर चव्हाण हे गुऱ्हाळावरती पत्रा शेडमध्ये येऊन झोपले असता झोपेमध्ये त्यांचा हात पत्र्याच्या शेडला लागल्यामुळे पत्रा शेडचा आवाज होऊ लागला होता. त्यावेळी शेडचे शेजारी राहणारी काजल पवार यांनी पत्रा वाजल्याचे कारणावरून दिनकर चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्याचवेळी त्या ठिकाणी सुनिल पवार हा व त्याची पत्नी कविता पवार हे ही त्याठिकाणी आले व त्यांनीही दिनकर चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी दिनकर चव्हाण व सुनिल पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी सुनिल पवार याने दिनकर चव्हाण यांना धक्काबुक्की केली त्यानंतर सुनिल पवार याने दिनकर चव्हाण यांच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बादली मारून शिवीगाळ केली. त्यावेळी दिनकर चव्हाण यानी तेथे असणारे पातेले उचलून सुनिल पवारच्या दिशेने फेकून मारले. त्यानंतर सुनिल पवार याने ऊसाच्या ट्रॉलीस लावणेचा लाकडी बांबू उचलून दिनकर चव्हाण यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी दिनकर चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोमवारी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.