‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
पाचगणी : ‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
येथील टाऊन हॉलमध्ये विविध गावांतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी सामाजिक अंतर पाळत आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पाचगणीचे सपोनि सतीश पवार, वीजवितरण कंपनीचे उपअभियंता एस. एन. बाचल आदी उपस्थित होते.
टिके म्हणाले, ‘कोरोनाचे संकट गडत होत चालले आहे. लोकांची भीती कमी झाली असली तरी धोका टळला नाही. गणेश मंडळांनी यावर्षी मंडप टाकून मूर्ती बसवण्यापेक्षा मंदिरात मूर्ती बसवावी. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. मंडळांनी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. त्याचबरोबर गरीब कोरोना रुग्णांना आर्थिक मदत करावी.’
गिरीश दापकेकर म्हणाले, ‘पाचगणीचे नागरिक प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करून सोशल डिस्टन्िंसग पाळत गणेशोत्सव साजरा करतील. सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करावा. तसेच शासनाचे निर्बंध हे नागरिकांच्या हिताचेच असल्याने त्याचे सर्वांनी पालन करावे.’
यावेळी सतीश पवार व एस. एन. बाचल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या यावेळी सांगितल्या.
प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले. वैभव भिलारे यांनी आभार मानले.
पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम व्यवस्था केली असून, छोट्या मूर्तींचे दान करावे व पालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्य टाकून सहकार्य करावे. दर्शनासाठी येणार्या भाविकांची रजिस्टरवर नोंद करावी. प्रसाद वाटप करू नये. पाचगणी या पर्यटनस्थळाला साजेशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पाचगणीचे सपोनि सतीश पवार यांनी केले.