सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
वाई : सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
पुणे येथे लेक्सिकॉन शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात सीए काळे यांना सन्मानित करण्यात आले.
‘लेक्सिकॉन’ ही उच्च शिक्षण देणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे. त्यांच्या संस्थेमध्ये इग्लंडमधील विद्यापीठाचे उच्च शिक्षण दिले जाते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते आयएएस अधिकारी यांनाही गौरविण्यात आले. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणात पुरस्कार मिळविलेल्या सर्वांचे कौतुक केले.
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सीए चंद्रकांत काळे म्हणाले, ‘राज्यपाल महोदय यांच्या हस्ते झालेला माझा सत्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. लेक्सिकॉन संस्थेचे डॉ. नीरज व प्रदीप शर्मा कुटुंबीय, बँकेचे संचालक मंडळ व बँकेचे सर्व घटक यांच्यामुळे मला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे माझी समाजकार्याची ऊर्जा वाढली आहे. ‘लेक्सिकॉन’ ही संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. सहकारी क्षेत्रात काम करीत असताना आपली बँक ठेवी ठेवणे, कर्ज गोळा करणे ही कामे करीत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही काम करीत आहे. बँकेचा शतक महोत्सव सुरू असून व्यवसायाचा 2 हजार कोटींचा टप्पा पूर्ण करीत आहोत.’
बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून 30 शाखा, 25 एटीएम सेंटर्सद्वारे बँक कार्यरत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, महापूर निवारण या कामासाठी बँकेने राज्य सरकारला वेळोवेळी आपल्या परिने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये संचालक मंडळाने आपला मीटिंग भत्ता, सभासदांनी आपला लाभांश, कर्मचार्यांनी आपला पगार यातून राज्य सरकारला मदत दिली आहे. या व अशा अनेक सामाजिक कामांची दखल घेऊन महाराष्ट्रातील विविध संस्था बँकेला व मला पुरस्कार देत आहेत, ही बँकेच्या सर्व घटकांच्या कामाची पोहोच पावती आहे. भविष्यातही बँकेला शेडूल्ड व मल्टिस्टेट दर्जा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु, कोविड काळामुळे ही कामे प्रलंबित राहिली आहेत. सर्वांच्या सहकार्यातून बँकेची अधिकाधिक प्रगती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला पुरस्कार मिळविण्याची संधी प्राप्त झाली. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सीए चंद्रकांत काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.