कोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता
News By : Muktagiri Web Team
औंध, ः खटाव तालुक्यातील औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या कोवीड सेंटर सुरू आहे. या सेंटरला वीजपुरवठा कमी पडत होता. तो वाढविण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कोरोना महामारीत तत्परता दाखविली. याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, औंध ग्रामीण रुग्णालयात 100 सिलेंडर प्रतिदिन या क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसवण्यासाठी 50 कि.वॅ. एवढा वाढीव मंजूर झाला आहे. सध्याच्या 63 के.व्ही.ए. रोहित्राची क्षमतावाढ करून 200 के. व्ही. ए. करण्याबाबत पत्र दि. 27 मे रोजी प्राप्त झाले. त्या अनुषंगाने सोमनाथ मुंढे कार्यकारी अभियंता वडूज व सुभाष घाटोळ उपकार्यकारी अभियंता औंध, उपविभाग यांनी तातडीने कार्यवाही करत दि. 28 मे रोजी अंदाजपत्रक मंडळ कार्यालय, सातारा यांच्याकडे पाठविले. मंडल कार्यालयाने देखील तातडीने जिल्हा नियोजन समिती सातारा, यांच्याकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविले. त्यांची प्रशासकीय मंजुरी दि. 1 जून रोजी प्राप्त झाल्यानंतर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना त्याच दिवशी औध उपविभागाने कोटेशन भरण्यासाठी दिले. दि. 1 जून रोजीच ठेकेदार स्वप्निल इलेक्ट्रिकल्स, टेंभू यांना कार्यकारी अभियंता वडूज यांनी काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्वप्निल इलेक्ट्रिकल्स टेंभू यांनी नवीन 200 के.व्ही.ए. ट्रांसफार्मरची ऑर्डर दिली. त्यानुसार आज दि. 4 रोजी दु. 1 वा. ट्रान्सफॉर्मर अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे औध येथे पोहचला. शाखा अभियंता, रुपेश लादे, लाईनमन सूर्यवंशी व सर्व जनमित्र, उपकार्यकारी अभियंता औंध सुभाष घाटोळ व ठेकेदार स्वप्नील साळुंखे यांनी दि. 4 जून रोजी रात्री बसविण्याचा निर्णय घेतला आणि सर्व पूर्वतयारी करून घेऊन दुपारी 3.20 वा. ते सायं. 6.30 वा. ट्रांसफार्मर बसवून इतर काम देखील 3 तासांच्या विक्रमी वेळेत वादळी पाऊसाला न जुमानता पूर्ण केले. सर्व प्रक्रियेमध्ये सोमनाथ मुंढे, कार्यकारी अभियंता वडूज यांचा सततचा पाठपुरावा लाभले. कोविड सारख्या महामारीमध्ये महावितरणने सर्व स्तरावरती दाखवलेली कार्यतत्परता यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व आरोग्य खाते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना धन्यवाद दिले.