जोडप्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्या योगेश मदनेच्या टोळीला मोक्का
News By : Muktagiri Web Team
सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने रा. राजापूर, ता. खटाव, (18 गुन्हे दाखल), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर रा. चौधरवाडी, ता. फलटण, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने रा. उपळवे, ता. फलटण, महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे रा. मोती चौक फलटण (21 गुन्हे दाखल), किरण मदने रा. राजापूर ता. खटाव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी किरण मदने याचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी, दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी एक वाजता सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र हे वीर धरण येथे फिरायला गेले होते. तेथे एके ठिकाणी गप्पा मारत उभे असताना बजाज पल्सर कंपनीच्या दोन मोटार सायकलवरुन आलेले एकुण चारजण त्यांच्या मोटार सायकली बाजूला लावून फिर्यादी व त्यांचा मित्र यांच्याकडे गेले. त्यावेळी चौघांपैकी एकाने फिर्यादी यांचा मित्र यास कुठला रे तु? इकडे काय करतोय असे विचारून थोबाडीत मारुन, फिर्यादी व त्यांचा मित्र यांना मारहाण करण्याची धमकी देवून, फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन, कानातील सोन्याचे टॉप्सचा एक जोड, मोबाईल हॅण्डसेट व फिर्यादीच्या मित्राच्या हातातील मोबाईल हॅण्डसेट जबरदस्तीने हिसकावून घेतला व मोबाईल मधील सिमकार्ड काढून तेथे फेकुन देऊन एकुण 40 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास पोनि उमेश हजारे करत होते. दरम्यान याच गुन्ह्यामधील आरोपी फलटण तालुक्यातील घाटात फलटण ग्रामीण पोलीसांना मिळून आले. चौकशीत आरोपींनी दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी वीर धरणपात्रालगत गप्पा मारत असलेल्या जोडप्यास लुटले असल्याची कबुली दिली व लुटलेला मुद्देमाल काढून दिला. त्यानुसार तपासी अधिकारी उमेश हजारे यांनी टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व साथीदारांना गुन्ह्याचे कामी वर्ग करुन घेतले व पुढील तपास केला.
तपासात टोळीतील आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर व इतर जोडरस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी दुकाचीस्वार व महिला प्रवासी, जोडपे यांच्यावर पाळत ठेवून वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज दगडाने, चाकू, सत्तूर, लाकडी दांडके सारखी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये कारवाई करिता पोलीस अधीक्षक, सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळचे पोनि उमेश हजारे, प्रविण शिंदे, अमित सकपाळ, वैभव सुर्यवंशी, स्वप्निल दौंड, शिरवळ पो. स्टे. यांनी सहभाग घेतला आहे.
टोळीप्रमुखाला दुसर्यांदा ‘मोक्का’
टोळी प्रमुख योगेश बाजीराव मदने व महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे वय 25 वर्ष यांच्यावर यापुर्वीही देखील मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती व ते नुकतेच जेलमधून सुटले होते.