कराड, दि. 27 ः आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने वाघेरी ता. कराड येथील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नाही, असा निर्णय घेतल्याने समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला आहे. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी व जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना आपल्या निर्णयाचे पत्र सरपंच मज्जीद पटेल, मस्जिद मुल्ला, इम्रान पटेल, हजी बशीर पटेल, रहीम कासम, सद्दाम पटेल यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून वाघेरी येथील मुस्लिम बांधवांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीला कूर्बानी न देता दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. दरम्यान मुस्लीम बांधवांनी पोलिस प्रशासनास याबाबत पत्र कळवले आहे. तर या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.