सातारा-पुणे महामार्गावर पाचवड हद्दीमध्ये असणार्या तीन शतके पूर्ण केलेला महाकाय गोरख चिंच या वृक्षाबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी काढत ‘झाडे वाचवा झाडे वाढवा’ असा संदेश दिला आहे.
कुडाळ : सातारा-पुणे महामार्गावर पाचवड हद्दीमध्ये असणार्या तीन शतके पूर्ण केलेला महाकाय गोरख चिंच या वृक्षाबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी काढत ‘झाडे वाचवा झाडे वाढवा’ असा संदेश दिला आहे.
देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हरितक्रांती व वृक्षारोपणाची चळवळ राबवणारे सयाजी शिंदे यांनी मुंबई येथे जात असतानाच महामार्गावरील पाचवड येथील तीन शतकापासून उभे असणार्या महाकाय गोरख चिंच या वृक्षासमवेत काही वेळ घालवला व तीन शतकापासून पाय रोवून बसलेल्या सातारा जिल्ह्यातील पाचवड हद्दीतील गोरख चिंच या वृक्षाच्या समवेत मनोमनी गप्पा देखील मारल्या.
सयाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, ‘देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात हरितक्रांती जवळ उभी केली आहे. नुकत्याच सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस गोळीबार महामार्गालगत असणार्या जागेत जैवविविधता गार्डन निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. विविध जैवविविधता बॉटनिकल गार्डन निर्माण करून महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे.’
जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने सातार्यात देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षलागवड चळवळ करून माळराने हिरवीगार करण्यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.