लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.
लोणंद : लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लोणंद येथील अशोक अनंत महामुनी यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नवनीत मधुकर नाईक व त्याची पत्नी प्रिया नवनीत नाईक (रा. भांडूप, मुंबई) यांनी घरमालक घरात नसल्याचे पाहून घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला होता. याप्रकरणी घरमालक अशोक महामुनी यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
लोणंद पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी पती-पत्नी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लोणंद पोलिसांनी सदर आरोपींकडून चोरी केलेले चार तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
आरोपी नाईक पती-पत्नी हे ‘बंटी-बबली’ या नावनेही परिचित असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, जालना, नगर, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांत घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत अशी आहे की, हे पेईंग गेस्ट म्हणून ज्या ठिकाणी राहत असत तेथील शेजार्यांशी मैत्री वाढवून शेजारी किंवा घरमालक बाहेरगावी गेल्यावर संधी साधून सदर आरोपी घरफोडी, चोरी करून पळ काढत होते.
या गुन्ह्याचा तपास पो. हवा. गार्डे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना. संतोष नाळे, श्रीनाथ कदम तसेच स. फौ. शिकिलगार, पो.हवा. गार्डे, महेंद्र सपकाळ, बी. के. पवार, पो. कॉ. शशिकांत गार्डी, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, महिला पोलीस प्रिया दुरगुडे यांनी सहभाग घेतला.