कराड, दि. 1 ः कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठवड्यापूर्वी चोरीस गेलेल्या तीन दुचाकी शोधण्यात कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रूपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण शाखेचे नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार विंग ता. कराड येथे सापळा लावला असता एका प्लेजर दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुले संशयितरित्या जात असताना दिसली. त्यांना ताब्यात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ती दुचाकी तांबवे येथून आठ दिवसापूर्वी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी कोळे येथील बैलगाडी शर्यतीमधील पार्किंगमधून एक बजाज मोटारसायकल व मलकापूर नगरपालिका जवळून एच. एफ. डिलक्सही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडील 1 लाख 55 हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली.