आमदार अनिल बाबर यांचं निधन
News By : विटा
विटा, प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलेजराव बाबर यांचे सांगली येथे खाजगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी ( ता.३०) दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जुन्या पिढीसोबतच नवीन पिढीशी ते सहज मिसळून जातात. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले.
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. कृष्णानदीतून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. टेंभू योजनेच्या पुर्णात्वासाठी साठी आयुष्यभर संघर्ष करत राहिले. त्यांच्या मागे दोन भाऊ , बहिण , दोन मुले , सुना , नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ला पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.