‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.
फलटण : ‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.
दरम्यान, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी कोरोनाबाधितांना मोफत सेवा देण्याच्या उद्देशाने स्वखर्चातून उभा केलेल्या सजाई गार्डन कोविड केअर सेंटरचे लोकार्पण सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रामराजे म्हणाले की, ‘कोरोनाचे अभूतपूर्व संकट हे संपूर्ण मानवजातीवर आलेले आहे. या महामारीमध्ये कुणीही कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. कोरोनाची पहिली लाट आल्यावर फलटण नगरपरिषदेच्या सहकार्याने आणि लाईफ लाईन हॉस्पिटलद्वारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर ते बंद करण्यात आले. आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे. फिल्ड लेवलवर काम करताना बेड्स व हॉस्पिटल सुविधा निर्माण करणे, हे गरजेचे आहे. सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. नागरिकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी माझ्या पदाच्या फायदा घेऊन जास्त प्रमाणावर औषधे, आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो. कोरोना काळात डॉक्टर व शास्त्रज्ञ हे जास्त गोंधळलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी एकत्रितपणे काम केले तर आपण जिल्ह्यातील नागरिकांना काहीही कमी पडू देणार नाही. नागरिकांनी मास्क वापरणे सोडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट करून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.’
फलटण शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वत्र घबराट निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये असणारे बेड्स हे कोरोना बाधितांसाठी पुरेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी 100 बेड्सचे सुसज्ज सजाई गार्डन कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केल्याने समाधान व्यक्त करून या कोविड केअर सेंटरमध्ये 28 ऑक्सिजन बेड तर 72 सर्वसाधारण बेड कोरोना बाधितांसाठी तयार करण्यात आले आहेत. या कोविड केअर सेंटरसाठी असलेल्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचार्यांच्या टीमची जबाबदारीही भोईटे यांनी घेतलेली आहे. नंदकुमार भोईटे यांचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे, असे मतही ना. रामराजे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे व किरण भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.