विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
केळघर : विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
सध्या विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गाचे काम गतीने सुरू आहे. केळघर बाजारपेठेत रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याची एक बाजू पूर्णपणे उकरली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पसरून ठेवले आहेत. रस्त्यावर मातीचे ढिगारे असल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या एक महिन्यापासून बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू होण्यापूर्वी येथील व्यापारी व ग्रामस्थ यांनी काम वेळेत पूर्ण करावे, याबाबतची मागणी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली होती. पावसआधी हे काम मार्गी लागण्याची आवश्यकता असताना ठेकेदाराकडून अत्यंत धिम्या गतीने काम सुरू असल्याचे दत्तात्रय बेलोशे यांनी सांगितले.
पावसापूर्वी काम न झाल्यास डोंगरावरून रस्त्यावर येणारे पाणी बाजारपेठेतील दुकाने व घरात घुसून स्थानिक ग्रामस्थांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ठेकेदारास वारंवार सूचना करून देखील बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कामाबरोबरच रस्त्याच्या लगतच्या नाल्यांची कामे होणे आवश्यक आहे. बाजारपेठेत असणारी झाडे, विजेचे खांब वेळेत काढणे आवश्यक आहे. ठेकेदाराकडून सलगपणे रुंदीकरणाचे काम होत नसून ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवल्याने वाहनचालक व ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी किमान एक बाजूचे रुंदीकरणाचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेळेत व दर्जेदार करण्यासाठी ठेकेदाराला सूचना केली असून, ठेकेदाराने ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेऊन लोकांची गैरसोय टाळण्यासाठी काम करावे.
- कृष्णात निकम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.