कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय
News By : Muktagiri Web Team

मुंबई दि. २४ : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी तातडीने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. आज मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयना जलाशयातील पाणीसाठा वापराबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशान्वये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील उर्वरित भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज दि. 24 नोव्हेंबर रोजी धरणातून 1050 क्युसेस क्षमतेने 2 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात आले आहे. सदरचे पाणी सांगली जिल्ह्याला पोहोचण्यासाठी दीड ते दोन दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी. आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात या वर्षी जवळपास 25 टक्के पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणातील 67 टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. मात्र या वर्षी जलसाठा कमी असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे. मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार, मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर किती वीज विकत घ्यावी लागेल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या बैठकीत जलसंपदा, महानिर्मिती आणि महाजनको यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये दहा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा आणि पंधरा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा तयार करून किती वीज खरेदी करावी लागेल याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी मंत्री देसाई यांनी दिल्या. या बैठकीस आमदार अनिल बाबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत मयेकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगिरी, महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, एमएलडीसी चे कार्यकारी संचालक शशांक जवळकर, कोयना धरणाचे मुख्य अभियंता चोपडे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे (दूर दृश्य संवाद प्रणाली द्वारे) बैठकीस उपस्थित होते.