कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौसी पर्यटकाची नेहमीच रेलचेल असते. मात्र 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस. पी. गोडसे यांनी दिली. याबाबत वन्यजीव विभागाच्या कोयना कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाताळ सणानिमित्त सलग सुट्ट्या आहेत. या कालावधीत अनेकजण पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरला काहीजण पर्यटनस्थळांवर जातात. या कालावधीत अवैध गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोयना वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 30 तसेच 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पर्यटनस्थळांवर तसेच कोयना वनपरिक्षेत्रातील वनहद्दीत कोठेही बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही वनक्षेत्रपाल एस. पी. गोडसे यांनी दिलाय. सहयाद्री व्याघ्र राखीव मधील व कोयना वनपरिक्षेत्रातील दि.३०,३१ डिसेंबर २०२२ व १ जानेवारी २०२३ रोजी नववर्षाचे स्वागत व सररत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात गर्दी करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव व सुरक्षेतेच्या कारणास्तव प्रतिवर्षी प्रमाणे कोयना वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरी पर्यटक व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व सहकार्य असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे