कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी व तडीपार करून जावळी तालुका दारूमुक्त, जुगारमुक्त आणि मटका मुक्त करावा, अशी मागणी जावळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्याकड
कुडाळ : कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी व तडीपार करून जावळी तालुका दारूमुक्त, जुगारमुक्त आणि मटका मुक्त करावा, अशी मागणी जावळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यामधील अवैध दारूने अनेकांचे संसार व आया-बहिणीचे कुंकू पुसले गेले. तर जावळी तालुक्यामध्ये सुरू असणार्या मटक्याच्या धंद्याने अनेक बेरोजगार युवक शेतकरीवर्ग व युवा पिढी बरबाद झाली आहे. गावागावांत, चौकाचौकांमध्ये खुलेआम कुठे फिरून तर कुठे टपरीत मटक्याचे अड्डे सुरू आहेत. जुगाराचे अड्डे देखील जागोजागी पत्ते कुटायचे क्लब राजरोसपणे सुरू आहेत, अशा सर्व अवैध धंद्याची माहिती असून देखील पोलिस यंत्रणा गप्प का?, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत पोलीस यंत्रणेच्या कामकाजाबाबत ताशेरे ओढले आहेत. तत्काळ या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग केवळ हप्ते गोळा करण्यासाठी जावळी तालुक्यामध्ये येत असतो. मात्र, जावळी तालुक्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अवैध दारूच्या विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे. अवैध दारू विक्री व अंकुश होणे हे उत्पादन शुल्क विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. वास्तविक, त्यांचेच कार्य असून देखील उत्पादन शुल्क विभाग कोठेही कर्तव्य बजावत असताना दिसून येत नसल्याचेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या दारात देखील बोंबाबोंब आंदोलन करून संबंधितांना कर्तव्याची जाण करून देऊ, असा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
जावली तालुक्यात गेल्या 12 वर्षांपासून महिलांनी आंदोलन करून उभी बाटली आडवी केली होती व त्यानंतर जावली तालुक्यात शासनमान्य दुकाने बंद करण्यात आली. जावली तालुक्यात दारूबंदीचा तालुका म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आला; मात्र काही महाभागांनी अवैधरीत्या दारूविक्री सुरू केल्यामुळे जावली तालुक्यातील तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊ लागली आहे. यामुळे अनेक तरुण देशोधडीला लागले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यातच अनेकजण मटक्याच्या व्यसनाच्या आहारी जात असून, येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जावली तालुक्याच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल व यातून होणार्या शांतता व सुव्यवस्थेला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शेवटी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी ‘मनसे’चे जावली तालुकाध्यक्ष अविनाश दुर्गावळे, तालुका संघटक अध्यक्ष नितीनदादा पवार, सहसचिव अक्षयराव जुनघरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष समीरदादा गोळे, मनविसे तालुकाध्यक्ष शुभम विधाते, मनविसे उपतालुका अध्यक्ष पै. अक्षय यादव आदी उपस्थित होते.