कृष्णा फौंडेशनचा सॅटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टशी सामंजस्य करार
News By : Muktagiri Web Team
कराड, वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांतून नोकरीची संधी मिळण्याबरोबरच उद्याचे नवे उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही राष्ट्रीय संस्था असून यामाध्यमातून सुमारे 2500 कंपन्या याठिकाणी काम करतात.
कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाठार येथे झालेल्या कार्यक्रमात हा करार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर, क्लबचे सचिव प्रदीप मांजरेकर यंग एंटरप्रुनर सेलच्या हेड रुपाली ठाकुर, सातारा रिजन हेड केदार साखरे, कृष्णा फौंडेशनच्या डॉ. अंजुमन मोमीन, डॉ. अशोक लोखंडे, हर्षल निकम, सीमा पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक.डॉ विनोद बाबर म्हणाले, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक नव उद्योजक निर्माण झाले आहेत. भविष्यात कृष्णा फाउंडेशनच्या च्या विद्यार्थ्यांना या कराराचा नक्की फायदा होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन उद्योगाची दालने खुली होतील. त्याचबरोबर नोकरीसाठी अनेक पर्याय उभे राहतील. महाराष्ट्रातील व्यवस्थापन महाविद्यालयातून या करारासाठी कृष्णा फाऊंडेशनची निवड झाल्यामुळे कृष्णा फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की फायदा होईल
यावेळी प्रदीप मांजरेकर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट एकमेका सहाय्य करून अवघे होऊ श्रीमंत हे ब्रीद वाक्य घेऊन उद्योजकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी व नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्लब महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
यावेळी डॉ. मोमीनन म्हणाले, कृष्णा फौंडेशनने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले असून त्यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम राबविण्याकडे कृष्णा फौंडेशनचा कल असतो. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कृष्णा फौंडेशन तत्पर असते त्याचाच एक भाग म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला. हा करार विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरेल हे नक्की. या करारासाठी अभिजीत गोडसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक कांबळे यांनी केले. तर आभार जयकर पाटील यांनी मानले.