उध्दव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपेटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळा आला असून महाराष्ट्र 5 ते 10 वर्षे मागे गेला आहे. महाराष्ट्राला यापुढे प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू असल्याचे मंत्री मिश्रा यांनी सांगितले.
कराड ः स्वातंत्र्यवीर सावरकर व धर्मवीर छत्रपती संभाजीराजेेेंबाबत चुकीची वक्तव्ये करणार्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत काय बोलायचे. राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नाही तर अजित पवारांवर त्यांचे काका शरद पवार यांचा विश्वास नाही, अशी टिका केंद्रीय गृहराज्यमंंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा संयोजक प्रमोद जठार, विक्रम पावसकर, धनाजी पाटील, एकनाथ बागडी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री मिश्रा म्हणाले, राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्याने घेत नाही. कारण त्यांच्याच पक्षातील लोक राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाहीत. तसेच अजित पवार यांनीच दबावतंत्र वापरून विरोधीपक्ष नेतेपद मिळवले आहे. ते मुख्यमंत्रीपदासाठीही वाटाघाटी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या काकांचाच विश्वास त्यांच्यावर राहिला नाही. भारतीय जनता पार्टी सातार्यासह सर्व महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघात जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा मतदार संघात विश्वासपूर्ण काम सुरू असून एक मजबूत संघटन झाले आहे. गेल्या तीन वर्षात इडीने केलेल्या कारवाईतून देशाला तीनशे कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इडीचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा निराशेच्या भावेतून होत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू, काश्मीरमधील 370 कलम हटविण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांची संख्या कमी झाली असून या ठिकाणी पर्यटनास चालना मिळाली आहे. याचबरोबर चीन सीमा भागातही चांगली सुरक्षा यंत्रणा असून एक इंचही चीन अतिक्रमण करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी सतत काम करणार पक्ष आहे. देशातील सर्व धर्मीय लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे लक्ष्य ठेवून पक्ष काम करत आहे. देशाच्या सेवा, सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रश्नांवर काम सुरू असल्यामुळेच भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. देशांतर्गत समस्या सोडवून जागतिकस्तरावर देशाला समृध्द, शक्तीशाली बनवण्याचे काम भाजपा करत आहे.